पणजी, दि. २८ – केंद्रीय रक्षा राज्य मंत्री श्री. श्रीपाद नाईक आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते `आयुष – ६४` या औषधी गोळ्यांच्या वितरण मोहिमेचा आजपासून प्रारंभ झाला. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या सहयोगाने आयोजित केलेला हा कार्यक्रम पर्यटन भवन, पाटो पणजी येथे संपन्न झाला.
आयुष – ६४ या औषधीच्या वितरण मोहिम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थि होते. आयुष-६४ हे सिद्ध औषध उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी आयुष मंत्रालयाचे अभिनंदन केले.
ते म्हणाले, “रोज नवीन नवीन संशोधने केली जात आहेत. गेल्या एका वर्षापासून आयुष मंत्रालयातर्फे कोविडवर प्रभावी ठरेल असे औषध देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आज `आयुष – ६४` च्या रुपाने आपल्या एक सिद्ध औषध मिळाले आहे. या औषधाच्या वितरणाचे कार्यही सुरू झाले ही अत्यंत आनंदाची बाब आहे.”
“कोविड रोगातून बरे झाल्यानंतर रुग्णांना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. अलीकडे रुग्ण बरे झाल्यानंतरदेखील त्यांच्या “कॉम्प्लिकेशन्स” झाल्याचे आढळून आले आहे. रुग्णांनी पुढचे सहा महिने खूप काळजी घेण्याची गरज आहे. आहार व दीनचर्या यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. कोविडपासून बरे झालेल्यांसाठी सरकारने आयुष चिकित्सालये स्थापन केली आहे. या सेवेचा लोकांनी पुरेपूर लाभ घ्यावा,”असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
श्रीपाद नाईक
हजारो वर्षांपासून परंपरागत सुरू असलेली आयुर्वेदिक पद्धती आजच्या गणितात बसत नाही. ही पद्धती पूर्वीपासून जशाच्या तशी आजही वापरली जात आहे. आयुष – ६४ लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी विलंभ झालेला असला तरी एक सिध्द औषध जगाला देता आले, याचा अधिक आनंद होत आहे, असे केंद्रीय रक्षा राज्य मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी नमूद केले.
भारतीय पद्धती जगाने स्वीकृत केली आहे. जगभरात या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. सात वर्षांपूर्वी भारताने जगाला `योग` दिला. योगमुळे कोविडची तीव्रता कमी झाल्याची कबुली पुरे जग देत आहे. योगव्यतिरिक्त उनानी, सिद्दा, होमिओपेथी सारख्या अन्य भारतीय पद्धती जगात आज मोठ्या विश्वासाने वापरल्या जात आहेत, असे श्री. नाईक पुढे म्हणाले.
याप्रसंगी आरोग्य खात्याचे उप-संचालक (आयुष विभाग) डॉ. दत्ता भट हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
मंत्रालयातर्फे देशभर राबविण्यात येणाऱ्या या व्यापक मोहिमेचा लाभ कोरोना बाधितांना मिळणार आहे. गृह विलगीकरण पत्करलेल्या/शिफारस केलेल्या कोविद रुग्णांना त्यांच्या नातेवाईक/प्रतिनिधी मार्फत आधार कार्ड व कोविड आरटीपीसीआर किंवा सात दिवसांच्या आत जलद चाचणीव्दारे पोसिटिव्ह सिद्ध झाल्याचा दाखला व एचआरसीटी चेस्ट रिपोर्ट सादर करून “आयुष – ६४ “ चे औषध मोफत मिळविता येईल.
कोविद बाधितांना `आयुष – ६४` मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून आयुष मंत्रालयाच्या पर्यटन भवन, पाटो, पणजी (फोन. क्र.०८३२ – २४३८५०१, डॉ. एच. के. गुप्ता ०९४४९९६४५९८, डॉ. अजय यादव ९०४९९२९३८९, श्री. सुरज नाईक ९८५०५२४००२ ) कार्यालयातून कामाच्या दिवसांत सकाळी १० ते संध्याकाळी ५ या कालावधीत वितरित करण्यात येईल.
याप्रसंगी डॉ. सुप्रिया धोंड, प्राथमिक आरोग्य केंद्र, खोर्ली, डॉ. समिर सडेकर, आसिलो हॉस्पिटल, श्री. बिपीन नाटेकर, अध्यक्ष (उत्तर गोवा) केशव सेवा साधना, श्री. संजय वालावलकर, केशव सेवा साधना, श्री. मिलिंद महाले, हेल्पिंग हँड, चोडण, श्री. दयानंद, उप-निरीक्षक सीआयएसएफ, डॉ. स्नेहा भागवत, गुरूकृपा आयुर्वेदिक्स, डॉ. दीपा मोरजकर, कोविड केअर सेंटर, मडगाव या वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधीकडे आयुष – ६४ औषधे सुपूर्द करण्यात आली.
सीसीआरएएसचे गोवा प्रमुख डॉ. एच. के. गुप्ता आयुष – ६४ संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे महा सचिव श्री. सुरज नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले.हेल्पिंग हँड, चोडणचे श्री. मिलिंद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
फोटो ओळी – केंद्रीय रक्षा राज्य मंत्री श्री. श्रीपाद नाईक व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत `आयुष – ६४` औषधांचे वितरण करताना. छायाचित्रात आरोग्य खात्याचे उप-संचालक (आयुष विभाग) डॉ. दत्ता भट हेही दिसत आहेत.