पणजी : गोयंकरपण वृत्त
राज्यातील पर्यटन क्षेत्र तसेच राज्याकडे आकर्षित होणाऱ्या पर्यटक यांच्या हिताचा विचार करत “पश्चिम भारत हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन” ने (हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया – एचआरएडब्लूआय) गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि माननीय पर्यटन मंत्रीमनोहर आजगांवकर यांच्याकडे गोवा राज्यात अॅप-आधारित टॅक्सी सेवाचालकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. राज्यातील स्थानिक अॅप-आधारित टॅक्सी सेवा असलेल्या ‘गोवा माइल्स’ विरोधात टॅक्सी चालकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेने ही मागणी केली आहे. पर्यटन क्षेत्रातील जाणकारांच्या मते, पर्यटकांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणाऱ्या टॅक्सी चालकांच्या तुलनेत अॅप-आधारित टॅक्सीद्वारे कमी शुल्कामध्ये चांगली सेवा दिली जात आहे. अनैतिक व्यावसायिक प्रकार राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासाला बाधक ठरत असल्याचेही जाणकारांचे मत आहे. त्याचबरोबर स्थानिक टॅक्सी चालकांच्या मागण्या चुकीच्या असून , स्पर्धाक्षम नाहीत. राज्यात अन्य पारदर्शी, व्यावहारिक अॅप-आधारित पर्याय उपलब्ध आहेत, असे मतही संघटनेने स्पष्ट केले आहे.
“ओला, उबेर आणि गोवा माइल्स” यांच्यासह विविध अॅप-आधारित कॅब चालक सेवांकडून पर्यटकांना त्यांच्या निवडीनुसार प्रवाससेवा उपलब्ध करण्यात येते. स्थानिक प्रवासी यांच्यासह देशी-विदेशी पर्यटकांना रास्त शुल्कामध्ये योग्य प्रवाससेवा या चालकांकडून उपलब्ध केली जाते.त्यामुळे अॅप-आधारित कॅबचालक सेवेला परवानगी देण्यात यावी. देशातील बहुतेक सर्व राज्यांमध्ये अॅप-आधारित कॅब सेवा सुरू आहे, पण पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या गोव्यात मात्र या सेवेस परवानगी नाही आणि त्यामुळे स्थानिक तसेच विदेशी पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. राज्यातील सर्व टॅक्सींसाठी ‘डिजिटल मीटर’चा वापर करण्याबाबतची राज्य शासनाने अंमलबजावणी करावी असेही आम्ही सुचवत आहे. यामुळे राज्यात टॅक्सी सेवेत पारदर्शीपणा वाढेल, सुलभ, विश्वसनीय टॅक्सी सेवा संस्कृतीस प्रोत्साहन मिळेल,” असे मत “एचआरएडब्लूआय”चे अध्यक्ष शेरी भाटिया यांनी मांडले.
“आज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ‘ऑनलाइन’ सेवा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. त्यामुळे आपल्या प्रवासाचे नियोजन करत कॅबसेवेसाठी पूर्वनोंदणी करण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांना अॅप-आधारित कॅब सेवा सुलभ, सोपी व वरदान ठरत आहे. प्रमुख पर्यटन राज्य असलेल्या गोव्यासही अशा सहज, सुलभ व रास्त शुल्क आकारणाऱ्या अॅप-आधारित कॅब सेवेचा लाभच होईल. त्यामुळे राज्यातील पर्यटन क्षेत्र तसेच पर्यटकांच्या हितासाठी गोवा माइल्ससह इतर अॅप-आधारित टॅक्सी सेवेला परवानगी देण्यात यावी, अशी आमची राज्य शासनाकडे अशी मागणी आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकास आणि प्रगतीमध्ये स्थानिक वाहतूक यंत्रणा महत्त्वाची ठरत असल्याने राज्याच्या पर्यटन विकासामध्ये शासनाचा हस्तक्षेप दूरगामी व परिणामकारक ठरणार आहे,” असे ठाम मत “एचआरएडब्लूआय”चे ईसी समिती सदस्य मिनिन प्रायोन्का यांनी व्यक्त केले.