मडगाव -गोयंकारपण वृत्त
गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील असंवेदनशील व बेजबाबदार भाजप सरकार प्रसिद्धीसाठी हपापलेले आहेत.कोविड लसीकरण केंद्रावर बॅनर लावुन सवंग प्रसिद्धी घेणाऱ्या भाजप सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून कोविड मुळे मृत्यू पावलेल्यांच्या मृत्यू दाखल्यांवर तसेच स्मशानभूमी व दफनभूमीवर भाजप नेत्यांचे फोटो प्रदर्शीत करण्याची विनंती करावी अशी जोरदार टीका प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
मडगावात आज आदर्श हायस्कुलात कोविड लसीकरण सुरू होणार असताना, सकाळी तेथे भाजपने लावलेल्या बॅनरला तिव्र आक्षेप घेताना कॉंग्रेस पक्षाने संताप व्यक्त केला आहे. डॉ. प्रमोद सावंत, श्रीपाद नाईक, सदानंद शेट तानावडे, विनय तेंडुलकर तसेच जे. पी. नड्डा व नरेंद्र मोदींचे फोटो असलेले बॅनर लावुन भाजपने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सात वर्षे पुर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे बॅनर कोविड केंद्रावर लावणे लज्जास्पद असल्याचे कॉंग्रेस पक्षाने म्हटले आहे.
विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी सदर प्रकाराकडे लक्ष वेधुन, सरकारी खर्चाने आयोजित कार्यक्रमात राजकीय पक्षाना श्रेय घेता येत नसल्याचे सांगितलं. त्याबाबतीत दक्षिण गोवा जिल्हाधीकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी कामत यांनी केली आहे.
दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस यांनी, करदात्यांचा पैसा खर्च करुन आपली प्रसिद्धी करून घेतल्याबद्दल भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी गोमंतकीयांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजप राज्याची तिजोरी लुटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष बिना नाईक यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. “आपदा मे अवसर” ची घोषणा देणाऱ्या भाजपने कोविड महामारीत “आजाराचा बाजार” केल्याचे त्यांनी म्हटले आहे. युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी यावर तिव्र प्रतिक्रीया दिली आहे. भाजपच्या बेजबाबदारपणाने लोक मरत आहेत. गोव्यात आजपर्यंत २६२५ लोकांचे कोविडने बळी गेले आहेत. लोक शोक व्यक्त करीत असताना, भाजप मात्र उत्सव साजरे करुन प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन करतो यावरुन या पक्षाची असंवेदनशीलता दिसते असे वरद म्हार्दोळकर यांनी म्हटले आहे.
जनसेवा ही प्रसिद्धी न करता करावयाची असते असे सांगुन, कॉंग्रेस सेवा दल संयोजक शंकर किर्लपारकर यांनी भाजपने प्रसिद्धी मागे न लागता सेवा दलाकडुन लोकसेवा कशी करावी याचे धडे घ्यावेत असा सल्ला दिला आहे. आज युवक व विद्यार्थ्यांना वेळेत लस द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. परंतु, जनतेच्या पैशावर डल्ला मारुन सरकार भाजपची प्रसिद्धी करीत असल्याचा आरोप ‘एनएसयुआय’चे अहराज मुल्ला यांनी केला आहे.
गोव्याचे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी कोविड लसीकरण केंद्रावर सकाळी येवुन उद्घाटन करण्याच्या केलेल्या नाटकाचा आम्ही निषेध करतो असे मडगाव गट कॉंग्रेस अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी म्हटले आहे. मडगाव भाजप मंडळाने समाजमाध्यमांवर लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असल्याची जी जाहिरातबाजी केली त्याचा आम्ही धिक्कार करतो. आता केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी खटाटोप करणाऱ्या भाजपने सदर लसीकरण हे केवळ मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले हे लक्षात ठेवावे असे म्हटले आहे. लसीकरणां सबंधी दक्षिण गोवा जिल्हाधीकाऱ्यांकडे आमदार दिगंबर कामत यांनी २८ एप्रिल व १ मे २०२१ रोजी केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती गोपाळ नाईक यांनी पुरावा म्हणुन सादर केल्या आहेत.