मडगाव – भाजपच्या केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणानेच आज लोकांमध्ये कोविड लसी बद्दल संशयाचे वातावरण तयार झाले आहे. सरकारने वारंवार आपली भूमीका बदलुन घोळ निर्माण केल्यानेच लोक स्वत: कोविड लस घेण्यास पुढे येत नव्हते. गोमंतकीयांनी कोविड लस घेणे गरजेचे आहे. लोकांनी कोविड लस घेऊन त्यांच्या जीवाचे रक्षण करावे असे आवाहन विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केले आहे.
मडगाव मतदारसंघात उद्या सोमवार ३१ मे ते गुरूवार ३ जून पर्यंत सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत चार केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरीकांसाठी कोविड लसीकरण आयोजित करण्यात आले आहे. मॉडेल मडगावचे सर्व नगरसेवक तसेच माझे सर्व कार्यकर्ते लोकांना लसीकरण करुन घेण्यासाठी मदत करणार आहेत. लोकांना लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी वाहतुक व्यवस्था करण्यात येणार आहे. सरकारने लसींचा आवश्यक साठा उपलब्ध करुन, पुर्ण दिवस लसीकरण चालु राहील याची जबाबदारी घ्यावी असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने वारंवार दोन कोविड लसींसाठी घेण्यासाठी मधल्या वेळेत बदल केले. कोविड आजारातुन बरे झालेल्यांना लस घेता येते का व कधी यावर अनेक तर्क वितर्क लढविण्यात आले. सरकारकडे आवश्यक लसींचा पुरवठा नसल्याने लोकांच्या मनांत जाणीवपुर्वक संभ्रम निर्माण करुन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला. कोविडची दुसरी लाट आल्यानंतरच सरकार झोपेतुन जागे झाले असा दावा दिगंबर कामत यांनी केला आहे.
आज कोविड लसीकरणाची जाहिरात करताना त्यावर कोविड योध्यांचे फोटो घालणे गरजेचे आहे. यावरुन लोकांमध्ये आत्मविश्वास तयार होण्यास मदत होईल. आज लोकांचा भाजप सरकारवरील विश्वास पुर्णपणे उडाल्याने जाहिरातीतील प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, इतर मंत्री व भाजप पदाधिकाऱ्यांचे फोटो पाहुन लोक घाबरत आहेत अशी टीका दिगंबर कामत यांनी केली आहे.
कोविड लसीकरणांस मिळणाऱ्या कमी प्रतिसादाबद्दल गोव्यातील पंचायती, नगरपालीका व लोक प्रतिनिधीनां दोष देणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. भाजपच्या गैर व्यवस्थापनामुळेच कोविड हाताळणीचा बोजवारा उडाला असल्याचे दिगंबर कामत म्हणाले.
कोविडची कोवेक्सीन ही लस वापरात आणतांना केंद्र सरकारने सदर लसीची आवश्यक असलेली तिसरी चाचणी फेरी पुर्ण होण्या अगोदरच मान्यता दिल्याने त्यावर गोंधळ निर्माण झाला. यामुळे लोकांच्या मनात भयाचे वातावरण तयार झाले.
भाजपशासीत उत्तर प्रदेशात २० जणाना कोविशिल्ड लसीचा पहिला डोज दिल्यानंतर कोवेक्सिनचा दुसरा डोज देण्याची घटना उजेडात आली आहे. अशी घटना गोव्यात घडू नये म्हणुन गोवा सरकारने याबद्दल पुर्ण खबरदारी व काळजी घेणे गरजेचे आहे.
राज्यातील १८ ते ४४ वयोगटासाठी सरकारने कोवेक्सिनच्या दोन लाख लसी मागविल्याचे जाहिर झाले आहे. सरकारने लसी देणारे आरोग्य खात्याचे कर्मचारी व इतर सबंधितांना योग्य सुचना देणे गरजेचे आहे.