वास्को: गोयंकारपण वृत्त
चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयाचे कोणत्याही किंमतीत खासगीकरण होऊ देणार नाही, असे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी शुक्रवारी सांगितले.
गुदिन्हो यांनी या रुग्णालयाचा आढावा घेतला आणि डॉक्टरांशी भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
गुदिन्हो म्हणाले, की अतिरिक्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रुग्णालयासाठी मान्यता मिळवून दिली आणि डॉक्टरांच्या मदतीसाठी आणखी एक कोविड तज्ज्ञ सल्लागार म्हणून डॉ. अनिल मेहंदीरट्टा यांचीही नेमणूक केली आहे.
गुदिन्हो म्हणाले, की कोणत्याही स्थितीत रुग्णालयाला खासगीकरणाची परवानगी दिली जाणार नाही. रुग्णालयाला ऑक्सिजन पाइपलाइन जोडण्यासाठी ‘जीएसआयडीसी’कडून प्रयत्न करणार आहे.
“आम्ही 40 ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध केले आहेत. तसेच डॉक्टर अनिल मेहंदीरत्ता यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. वैद्यकीय सहाय्य कर्मचारीही वाढविले आहेत. ‘जीएसआयडीसी’कडून ऑक्सिजन पाईपलाईन जोडणी करण्यास का उशीर होत आहे याची मला कल्पना नाही.परंतु आम्हाला ती मंजूर होईल आणि त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. या रुग्णालयात थेट ऑक्सिजन जोडणी असणे आवश्यक आहे कारण आम्हाला या रुग्णालयात सुधारणा आवश्यक आहेत.
“शासनाने डॉक्टर आणि परिचारकांना पाठिंबा दर्शविला पाहिजे. दर आठवड्याला परिस्थितीचा आढावा घेणार आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणेबाबत पाठपुरावा करणार आहे “असे गुदिन्हो म्हणाले.
गुदिन्हो म्हणाले की, ते कोणत्याही किंमतीवर चिखली उपजिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण करू देणार नाहीत.मला कळले आहे की रुग्णालयाच्या वरच्या मजल्याचे खासगीकरण करण्याचा आणि कोविडच्या 60 खाटांच्या रुग्णालयात रुपांतर करण्याचे प्रयत्न चालू असून मी हे होऊ देणार नाही. आम्ही लोकांसाठी सरकारी पायाभूत सुविधांवर इतका पैसा खर्च केला असून ते काढून खासगी संस्थेला देणार नाही.मंत्री म्हणून मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे आणि हे होऊ देणार नाही. ऑपरेशन थिएटरदेखील कार्यान्वित होईल आणि हे माझे आश्वासन आहे.
गुदिन्हो म्हणाले की, संपूर्ण दाबोली मतदारसंघाला लस दिली जाईल.18 वर्षावरील लोकांसाठी पोर्टल सुरू झाल्यावर आम्ही स्वयंसेवक घेऊ आणि प्रत्येकाला लसी देऊ. टीका करण्याची ही वेळ नाही.लोकांनी त्याऐवजी सूचना देण्याची व सेवा देण्याची गरज आहे,”.