पणजी :गोयंकारपण वृत्त
एकीकडे गोमंतकीय दररोज मृत्यूशी सामना करत असताना भाजप सरकार मात्र राजकारण व नाटक करत असल्याचा आरोप ‘आम आदमी पार्टी’ने (आप )केला आहे.
मुख्यमंत्री सावंत आणि आरोग्यमंत्री राणे यांच्यातील राजकीय भांडणांची आठवण करुन देताना म्हांबरे म्हणाले की, त्यांच्यातील भांडणामध्ये सामान्य माणसांचा मात्र जीव जाईल, ही भीती आता वास्तवात उतरली आहे. गोमेकॉच्या नोडल अधिकाऱ्याने आज उच्च न्यायालयात ऑक्सिजनची कमतरता असल्याचे अधिकृतपणे मान्य केले आहे.
ऑक्सिजन संकटावर ‘आप’ने सतत दिलेल्या सतर्कतेकडे लक्ष दिले गेले असते, तर आज शेकडो मौल्यवान गोवेकरांचे जीव वाचू शकले असते.
म्हांबरे म्हणाले ,”आरोग्यमंत्र्यांनी स्वतःच्याच विभागाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी हायकोर्टाची चौकशी समितीची केलेली मागणी,तसेच आमदार बाबुश मोन्सेरात यांची अनपेक्षित विधाने आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी धक्का देणारी आहे.हा सर्व प्रकार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे राजकीय ‘तियात्र ‘ आहे त्यात ते आपल्या स्वतःच्या राजकीय अपयशापासून जनतेची दिशा भटकवू पाहत आहे.
जर राणे यांना हायकोर्टाने दिलेल्या सर्व गंभीर धोक्यांची कल्पना होती,तर मग जेव्हा शेकडो लोकं मरत होती, तेव्हा त्यांनी मौन का बाळगले? तसेच वाढत्या कोरोनाबद्दल मोन्सेरात यांना अचानक कशी काय काळजी वाटायला लागली? असा प्रश्न म्हांबरे यांनी उपस्थित केला. कारण जेव्हा त्याच्यांच स्वत: च्या मतदारसंघात सुपर-स्प्रेडर कॅसिनो चालू होता तेव्हा मात्र ते मूग गिळून गप्प होते, असेही म्हांबरे पुढे म्हणाले.
प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर आता लोकांचा विश्वास राहिला नसल्याचे सांगून, गोव्यातील लोकांचा सरकारी रुग्णालयांवर विश्वास वाढण्यासाठी आता राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी म्हांबरे यांनी मागणी केली.