पणजी -गोयंकारपण वृत्त
कोविड महामारीत “आजाराचा बाजार” करुन आपली तुंबडी भरणाऱ्या भ्रष्ट भाजप सरकारने आता ‘आयव्हरमेक्टिन’ गोळ्यांचा “घोटाळ्यात घोटाळा” केला आहे.गोव्यातील आरोग्य केंद्रात लोकांना मोफत वितरणांसाठी सदर गोळ्या आजपर्यत उपलब्धच नसल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब रू. २२.५० कोटींच्या सदर गोळ्या कोठे व कशा गायब झाल्या हे स्पष्ट करावे,अशी मागणी कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
आज आम्ही गोव्यातील सुमारे पंधरा आरोग्य केंद्राकडे संपर्क साधुन सदर गोळ्या उपलब्ध आहेत का याची चौकशी केली. अनेक गावांतील लोकांकडे संपर्क साधुन सदर गोळ्या त्यांना मिळाल्या का याची आम्ही विचारपुस केली. परंतु सगळ्याकडुनच आम्हाला नकारार्थी उत्तर मिळाले. महिला व बाल कल्याण खात्याचे कर्मचारी व अंगणवाडी सेविकांनाही आयव्हरमेक्टिन गोळ्यांबद्दल काहीच माहिती नसल्याचे उजेडात आले आहे असा दावा गिरीश चोडणकर यांनी केला.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी १० मे २०२१ रोजी घोषणा करुन मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादाने कोविड आजारावर खबरदारीचे उपचार म्हणुन आयव्हरमेक्टिन गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर १७ मे रोजी आरोग्यमंत्र्यांनी महिला व बाल कल्याण खात्याचे कर्मचारी व अंगणवाडी सेविकां मार्फत सदर गोळ्या मोफत वाटण्यात येणार असल्याचे सांगितले होते. कॉंग्रेस पक्षाने दोन्ही वेळा आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेस आक्षेप घेतला होता याची आठवण गिरीश चोडणकर यांनी करुन दिली.
कॉंग्रेस पक्षाने गोमंतकीयांना सदर गोळ्यांचे आरोग्य चाचणी केल्याशिवाय सेवन करु नका,असे आवाहन केल्यानंतर लोकांचा रोष पत्करावा लागू नये म्हणुन भाजप सरकारने सदर गोळ्या डांबुन ठेवण्याचा निर्णय घेतला असावा. तसे असल्यास सदर गोळ्यांच्या खरेदीसाठीचे रु. २२.५० कोटी आता कुणाकडून वसुल करणार हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
कॉंग्रेस पक्षाने जागतीक आरोग्य संघटना व वैद्यकीय व विज्ञान क्षेत्रातील तज्ञांचा हवाला देवुन सदर गोळ्या आरोग्य चाचणी न करता घेतल्यास जीवाला अपायकारक ठरू शकतात हे लोकांच्या नजरेस आणुन दिले होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर गोळ्याचे वितरण करण्याचा निर्णय कुणाच्या सल्ल्याने घेतला गेला ते स्पष्ट करावे. जागतीक आरोग्य संघटनेच्या विरूद्ध भाजप सरकारला सल्ला देणाऱ्या तज्ञांची नावे हिम्मत असेल तर सरकारने लोकांसमोर ठेवावी अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
कॉंग्रेस पक्ष मागील कित्येक दिवस सदर गोळ्यांच्या खरेदीसाठी सरकारने निवीदा जारी केली होती का? सदर गोळ्या पुरविण्याचे कंत्राट कुणाला व किती रकमेला दिले याची माहिती उघड करण्याची मागणी करीत आहे.परंतु, सरकार मात्र जाणीवपुर्वक सदर माहिती देण्यास टाळाटाळ करते असे चोडणकर म्हणाले.
गोमंतकीयांनी योग्य आरोग्य चाचणी केल्या शिवाय तसेच वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय सदर गोळ्यांचे सेवन करु नये असे कॉंग्रेस पक्ष लोकांना परत एकदा आवाहन करीत आहे असे गिरीश चोडणकर म्हणाले.