पणजी -गोयंकारपण वृत्त
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ‘आयव्हरमेक्टिन’ गोळ्यांचा वापर कोविड आजारावर करण्यास गोवा सरकारला खुली परवानगी दिल्याचे भासवुन गोव्याचे भ्रष्ट व बेजबाबदार आरोग्य मंत्री विश्वजीत राणे जनतेची दिशाभूल करीत आहेत. उच्च न्यायालयाने कोविड आजारावर खबरदारीचा उपाय म्हणुन योग्य आरोग्य चाचणी न करता सदर गोळ्यांचा वापर करण्यास मान्यता दिली आहे का?.१० मे २०२१ रोजी आरोग्यमंत्र्यांनी जाहिर केल्या प्रमाणे सदर गोळ्यांचा वापर “प्रोफिलेक्सीस ट्रिटमेंट” म्हणुन आता करता येणार का?, हे हिम्मत असेल तर आरोग्य मंत्री विश्वजीत राणेंनी स्पष्ट करावे अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
आरोग्यमंत्र्यांनी १० मे २०२१ रोजी दावा केल्या प्रमाणे सदर ‘आयव्हरमेक्टिन’ गोळ्यांचा कोविड आजारावर खबरदारीचा उपाय म्हणुन वापर करण्यास त्यांना आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आशिर्वाद आहे का, हे विश्वजीत राणेनी गोमंतकीयांना सांगावे.
जागतीक आरोग्य संघटनेने आयव्हरमेक्टिन गोळ्यांच्या सेवनाबद्दल सरकारच्या विरूद्ध निर्देश जारी केल्या नंतर, भारतीय वैद्यकीय संघटनेची गोवा शाखा , गोमेकॉची निवासी डॉक्टर संघटना तसेच बाल रोग तज्ञांची स्थानिक शाखा यांनी कोविड उपचारांबद्दल घेण्यात येणाऱ्या उपायाबद्दल भाजप सरकार त्यांना विश्वासात घेत नसल्याचे उघडपणे सांगुन आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. सरकारला सदर गोळ्यांच्या वापरा बद्दल नेमके कुठल्या तज्ञानी सल्ला दिला हे विश्वजीत राणे यांनी जनतेला सांगावे.
आरोग्य खाते व गोमेकॉच्या मेडिसीन विभाग, फार्माकोलोजी विभाग, पॅथोलोजी विभाग व पलमोनरी औषध विभागांचे प्रतिनीधी सरकारने गठन केलेल्या तज्ञांच्या समितीचे सदस्य आहेत का? हे आरोग्यमंत्र्यानी सांगणे गरजेचे आहे. सदर चार विभागांच्या तज्ञानी आयव्हरमेक्टिन गोळ्यांच्या प्रोफीलेक्सीस ट्रिटमेंटला मान्यता दिली होती का याचा पुरावा विश्वजीत राणेनी लोकांसमोर ठेवावा.
गोव्यातील तमाम आरोग्य केंद्रातील आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा साठा अचानक शुन्य झाल्याचे आम्ही सरकारच्या निदर्शनास आणुन दिले होते. कोविड रुग्णांना देण्यात येणारे ऑक्सिमीटर हे अगदी खालच्या दर्जाचे आहेत व काही चालतच नाहीत हे आम्ही आरोग्यमंत्र्यांच्या नजरेस आणुन दिले होते. परंतु, विश्वजीत राणेनी सोयिस्करपणे त्यावर मौन बाळगले आहे यावरुन हा घोटाळाच असल्याचे स्पष्ट होते.
सर्वांत भ्रष्ट आरोग्यमंत्र्यांनी आजाराचा बाजार करुन भरमसाठ माया जमविली असुन, सरकारी तिजोरी लुटण्याचे काम केले आहे. विश्वजीत राणे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमेकॉतील निष्पाप कोविड रुग्णांचा ऑक्सिजनचा पुरवठा न करता खुन केला आहे. सदर मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळवुन देण्यास व या दोघांनाही कठोर शिक्षा बजावण्यास कॉंग्रेस पक्ष सर्व प्रयत्न करणार आहे.