आम आदमी पक्षाने म्हटले आहे की, जीएमसी येथील वॉर्डात काल अचानक ऑक्सिजन संपला गेला तरीही प्रसंगावधानाने मोठी आपत्ती टाळली गेली असली तरी गोवा सरकार अद्याप मात्र जागे झालेले नाही. सरकारच्या तीव्र उदासिनतेबद्दल आणि कारभाराबद्दल अविश्वास व्यक्त करताना, राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, जीएमसीमधील आजची परिस्थिती खरोखरच अधिक बिकट झालेली आहे आणि बर्याच रुग्णांना आता ऑक्सिजन सिलिंडरसाठी स्वत:च व्यवस्था करण्याचे स्पष्ट सांगितले आहे.
म्हांबरे यांनी काल रात्री घडलेल्या घटनेबद्दल सांगितले की, जीएमसीच्या प्रभाग 142 मध्ये एका रुग्णाचा ऑक्सिजन संपला. शिवाय त्याची ऑक्सिजन पातळी देखील कमी होत होती. यामुळे रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकला असता. मात्र ज सर्व प्रकार जागरूक नागरिक अॅश्ले डॅलानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर पोस्ट केला. यानंतर सदर घटनेची दखल घेत आपचे नेते व प्रवक्ते वाल्मीकि नाईक यांनी तातडीने मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना सदर प्रकाराबाबत दूरध्वनीद्वारे कळविले, त्यानंतर ऑक्सिजनचा आपत्कालीन पुरवठा आणण्यात आला.
म्हांबरे म्हणाले की, ” वेळेवर कारवाई झाल्याने मोठी दुर्घटना थांबली. परिस्थिती इतकी वाईट आहेत की, डॉक्टर इतर वॉर्डातून सिलिंडर आणत होते आणि त्यांना रुग्णांना जिवंत ठेवण्यासाठी एक सिलिंडर एकापेक्षा जास्त रूग्णांमध्ये वाटून घेत होते.
या अशा प्रकारांमुळे आधीच अनेक मृत्यू झाल्याची नोंद असूनही ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी विशेष SOS यंत्रणा अद्याप का तयार केली गेली नाही? या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी जलद गतीने व ठराविक दिवसांच्या आत चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आपने केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि आरोग्यमंत्र्यांनी आतापर्यंत होणाऱ्या मृत्यूसाठी आता मात्र रुग्णांच्या सहआजारांना व वेळेवर वैद्यकीय उपचार न घेणे, यांस जबाबदार धरले आहे, असे सांगून म्हांबरे यांनी रुग्णालयांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावल्याबद्दल आता कोणाला जबाबदार धरायचे? हा प्रश्न उपस्थित केला.
मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या चाललेल्या दोषारोपांच्या खेळीचा म्हांबरे यांनी निषेध केला असून त्यांनी नमूद केले आहे की, भाजपा सरकार आता यापुढे कोणत्याही स्पष्टीकरणाच्या मागे लपून जबाबदारीतून अंग झटकून टाकू शकत. जनताही यास माफ करणार नाही. भाजप सरकारने कोरोनाकाळातील या अव्यवस्थेबाबत सामूहिक जबाबदारी स्वीकारत यात सुधारणा करावी अन्यथा सरकारने खुर्ची सोडावी, अशी मागणी म्हांबरे यांनी केली.
अशा प्रकारच्या निराशादायक व दु:खदायक काळातही भाजपचे आमदार मात्र मंत्री मंत्रिमंडळात आवडीचे खाते मिळविण्यासाठी आपापसांत संघर्ष करीत आहेत, अशी टीका म्हांबरे यांनी केली.