मडगाव -गोयंकारपण वृत्त
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी गोव्याला घटकराज्याचा दर्जा दिला. स्थानिक स्वराज्य संस्थाना मजबुत करण्याचे काम राजीव गांधीनी केले. परंतु, भाजप सरकारने आज राज्याची स्थिती संघप्रदेशासारखी करुन टाकली आहे, असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमीत्त दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात आयोजित आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक, दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, प्रदेश कॉंग्रेसचे सुभाष फळदेसाई, दामोदर शिरोडकर तसेच जिल्हा कॉंग्रेसचे पिटर गोम्स, ॲड. येमन डिसोजा, आर्क. रॉयला फर्नांडिस व इतर हजर होते.
परवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात व दिवची हवाई पाहणी केली. काल पंतप्रधानानी घेतलेल्या विवीध राज्यांच्या’ डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट’च्या बैठकीत गोव्याला स्थान देण्यात आले नाही. यावरुन भाजप सरकारला गोवा व गोमंतकीयांच्या यातनांचे काहिच पडलेले नाही हे स्पष्ट होते, असे दिगंबर कामत म्हणाले.
आज संपुर्ण देशात कोविड संसर्गाची सर्वाधिक लागण झालेल्यांत गोवा अगदी वरच्या स्थानावर आहे. ऑक्सिजन अभावी गोव्यात ७४ जणांचे प्राण गेले. आज कोविड लसिकरण व चाचणी यात गोवा अगदी शेवटच्या पातळीवर आहे. या परिस्थितीत गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे बोलणे हे पंतप्रधानांचे कर्तव्य होते. परंतु, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांबरोबर पुडूचेरी राज्याला सुद्धा सदर बैठकीत सहभागी करुन घेताना पंतप्रधानांना गोव्याची आठवण झाली नाही हे धक्कादायक आहे ,असे दिगंबर कामत म्हणाले.
सन २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासुन भाजपने गोव्याला सापत्नभावाची वागणुक दिली आहे. म्हादई पाणी वाटपात भाजप सरकारने गोव्याचा विश्वासघात केला. भाजपनेच बंद पाडलेला खाण व्यवसाय सुरू करण्यास केंद्रातील भाजप सरकार काहिच करीत नाही. गोव्याची अस्मिता नष्ट करुन इथे कोळसा हब करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करीत आहे. पर्यावरण नष्ट करुन मोले येथे तीन प्रकल्पांचे काम पुढे रेटण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे ज्याचा फायदा केवळ क्रोनी क्लबला होणार आहे. भाजप सरकारने गोमंतकीयांना किनारी व्यवस्थापन आराखडा सुनावणीतही भाग घेण्यास दिल नाही. यावरुन भाजपची गोव्याच्या विरूद्धची भूमीका स्पष्ट होते.
केंद्रातील कॉंग्रेस सरकारांचे गोव्यासाठी खास योगदान होते. स्व. राजीव गांधी यांनी गोव्याला घटकराज्याचा दर्जा दिला. कोंकणीला राजभाषेचा दर्जा व घटनेच्या आठव्या परिशिष्टात स्थान राजीव गांधीमुळेच मिळाले, हे सत्य आहे. गोव्यावर केलेल्या उपकारांसाठी गोमंतकीय नेहमीच त्यांचे ऋणी राहतील असे दिगंबर कामत म्हणाले.
आज राज्यातील भाजप सरकारला केंद्रातील भाजपचेच सरकार किम्मत देत नाही. राज्य सरकारचा रिमोट आज दिल्लीतील नेत्यांच्या हातात आहे. यामुळेच गोमंतकीयांना त्रास व कष्ट सहन करावे लागत आहेत असे दिगंबर कामत म्हणाले.
कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी बोलताना स्व. राजीव गांधी यांनी संघीय प्रणालीचा वापर करुन स्थानिक स्वराज्य संस्थानी अधिकार दिल्याचे सांगीतले. नगरपालीका व पंचायतीना मजबुत बनविण्याचे काम स्व. राजीव गांधीनी केले. आजचा दिवस कॉंग्रेस पक्ष माणुसकीला सेवा देवुन पाळणार असल्याचे त्यांनी सांगीतले . आज भाजप सरकार देशात कोविड लसीकरण करण्यासाठी चाचपडत असताना, देशवासीयांना कर्तबगार असलेल्या माजी पंतप्रधान राजीव गांधीची उणीव भासते असे ते म्हणाले. राजीव गांधीनी जी स्वप्ने पाहिली ती प्रत्यक्षात उतरवुन दाखविली असे गिरीश चोडणकर म्हणाले.
महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक यांनी महिला कॉंग्रेसने हाती घेतलेल्या विवीध उपक्रमांची माहिती दिली. दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस यांनी संपुर्ण दक्षिण गोव्यात विवीध गट कॉंग्रेसतर्फे सेवा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले.कोविड व चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी कॉंग्रेस सदस्य आज कार्यरत असल्याचे ते म्हणाले.
सुरूवातीला उपस्थित सर्व कॉंग्रेस नेते, पदाधिकारी व सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी स्व. राजीव गांधींच्या तसबिरीला पुष्पांजली अर्पण करुन आदरांजली वाहिली.







