लोकांनी निवडून दिलेल्या आमदार आणि लोकप्रतिनिधींनी कोरोनाच्या संकटकाळात जनतेला वार्यावर सोडल्याची आम आदमी पक्षाने कठोर टीका केली. याविषयी माहिती देताना आपचे राज्यसंयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, आपचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक व्यथित आणि तणावग्रस्त गोयंकरांच्या मदतीला धावून जात आहे. निवडणुका होण्यापूर्वी सक्रिय असलेल्या नेत्यांनी निवडून आल्यानंतर मात्र आपली जबाबदारी पूर्णपणे झटकून टाकली आहे. अशी टीका त्यांनी केली.
याविषयी सांगताना म्हांबरे यांनी एका घटनेचे वर्णन केले. ज्यामध्ये एका कोरोना रुग्णाने स्थानिक आमदाराला हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देण्यासाठी विनंती केली परंतु बहिरेपणाचे सोंग घेतलेल्या लोकप्रतिनिधीने त्याकडे लक्ष दिले नाही. परिणामी रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्दैवाने याच राजकारण्यांना स्वतःला जेव्हा वैद्यकीय उपचारांची गरज भासते तेव्हा मात्र ते व्हीआयपी उपचाराची मागणी करणाऱ्यांत पहिल्या रांगेत असतात. तेही त्याच करदात्याच्या पैशात ,ज्याला की त्यांनी गरजेवेळी रस्त्यावर सोडलेले असते, अशी माहिती म्हंबरे यांनी केली.
केवळ टीका उत्सवाचे पोस्टर्स चिटकवून किंवा लॉकडाऊनसाठी न्यायालयीन आदेश देणे पुरेसे नाही. तर कोविडच्या परिस्थितीला योग्यरीत्या हाताळण्यासाठी ग्रामीण पातळीवर निर्णयप्रक्रियेचे विकेंद्रीकरण करावे व आमदार, जि. प. सदस्य ते नगरसेवक ते सरपंचांपर्यंत प्रत्येक निवडून आलेल्या प्रतिनिधीला विशिष्ट कामे, जबाबदारी देण्यात येईल याची काळजी घ्यावी, असे आवाहन म्हांबरे यांनी मुख्यमंत्र्यांना केले. त्यांनी पीएचसी, सीएचसी आणि अगदी खासगी रुग्णालये आणि क्लिनिकशी जोडलेल्या गावपातळीवर विलगीकरणकेंद्रे तयार करण्याची सूचना केली. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी सरकार मंदिर/चर्च हॉल, इतर धार्मिक/सामाजिक संस्था, स्कूल हॉलची मदत घेऊ शकते, कारण बर्याच लोकांना घरी विलगीकरणासाठी वेगळ्या खोल्या नसल्यामुळे व्हायरस वेगाने पसरत आहे.
म्हांबरे यांनी नमूद केले की, आपचे कार्यकर्ते रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन आणि रुग्णवाहिकांमधून अन्न, औषधे आणि ऑक्सिमीटरपर्यंत सर्व प्रकारच्या समस्या हाताळत आहेत. त्यांनी माहिती दिली की, आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांनी आपच्या ऑक्सिमीटर सेवेचा लाभ घेतला आहे, या सर्वांनी खुल्या बाजारातील कोरोना किट आणि ऑक्सिमीटरच्या कमतरतेनंतर आपने वेळेवर घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले आहे.
बेड, ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे लोक रुग्णालयांच्या बाहेर अडकले आहेत आणि त्यामुळेच रुग्णांचा मृत्यू होत आहेत मात्र ही वस्तुस्थिती माहीत असताना देखील मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री कोरोना प्रसारासाठी वारंवार लोकांनाच जबाबदार ठरवत आहेत ,अशी माहिती देताना म्हांबरे यांनी संताप व्यक्त केला.
बेडच्या उपलब्धतेविषयी ऑनलाइन माहिती देण्याच्या ‘आप’च्या सातत्यपूर्ण मागणीनंतर उघडण्यात आलेले वेब पोर्टल अवघ्या दोनच दिवसात बंद पडले असल्याचे म्हांबरे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांनी मागणी केली की, वाढदिवसाच्या शुभेच्छा, सणाच्या शुभेच्छा आणि इतर जाहिरातींऐवजी सरकारने कोविड रुग्णालयातील सर्व आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक, कोरोना नोडल अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आणि इतर महत्वाची जीवनरक्षक माहिती नियमितपणे प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये प्रकाशित करावी, जेणेकरून लोकांना आवश्यकतेनुसार योग्य माहिती मिळेल व त्यांचा कोरोनापासून बचाव होईल.