पणजी:गोयंकारपण वृत्त
रायबंदरमधील जुन्या ‘गोमेकॉ ‘आवारात स्थानिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या मागणीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र राज्य सरकारने आयुष रुग्णालयासाठी सदर जागा देण्याचा प्रस्ताव आज तातडीने मंजूर केला आहे.
रायबंदर येथील ‘गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या (जीआयएम) बिल्डिंगमध्ये आयुष मंत्रालयाला जागा देण्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासमवेत बैठक घेतली.
यावेळी,महसूल सचिव
आयएएस संजय कुमार, मुख्य सचिवांचे सचिव अशोक कुमार, आयएएस, आणि उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर उपस्थित होते.
लोलयेकर यांनी सांगितले की, शासनाने दरमहा प्रति चौरस मीटर १०० / – नाममात्र भाडे आकारून 30वर्षांच्या मुदतीसाठी जागा देण्याचे ठरविले आहे.
गोव्यातील लोकांच्या हितासाठी आयुष रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रक्रिया वेगवान करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आयुषमंत्री व अन्य संबंधित अधिकाऱ्यांना केले.
गोयंकारपण’शी बोलताना अॅडव्होकेट आयरिश रॉड्रिग्ज म्हणाले की,
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘यू-टर्न ‘दिलेले वचन फिरवणे हे अत्यंत दुर्दैवी व दु:खदायक आहे.जुने रायबंदर हॉस्पिटल परिसर आयुष मंत्रालयाला देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
“गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आरोग्य केंद्र सुरू झाल्यावर वैद्यकीय सुविधा पूर्ववत केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याच दिवशी आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्यासमवेत पणजीचे आमदार बाबुश मोनसेरात यांनी या आवाराला भेट दिली आणि जाहीर केले, की आरोग्य सेवा संचालनालय आणि गोवा मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 30 खाटांचे आरोग्य केंद्र सुरू केले जाईल नंतर हळूहळू ते पूर्ण दर्जाचे केले जाईल.
ते म्हणाले की, त्यांच्या प्रस्तावित आरोग्य केंद्राची फाईल सहा महिन्यांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी मंजूर केली होती.परंतु केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या आयुष मंत्रालयाच्या विरोधामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याना थांबविले होते.
“श्रीपाद नाईक हे रायबंदर येथील रहिवाशी असूनही आरोग्य केंद्राच्या विरोधात आहे ही विचित्र गोष्ट आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कार दुर्घटनेनंतर ते आयुष उपचारमुळे नव्हे तर गोवा मेडिकल कॉलेजमधील वैद्यकीय कौशल्यमुळे ते वाचले आहेत हे समजले पाहिजे.
यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या मनपा निवडणुकीत बाबूश मोनसेरात यांनी आम्हाला आश्वासन दिले होते, की जुन्या रायबंदर हॉस्पिटलमधील हेल्थ सेंटर या पावसाळ्यापूर्वी वास्तवात येईल. आयरिश यांच्या म्हणण्यानुसार, मोनसेरात आणि त्याचे तीन रायबंदरचे नगरसेवक आता दिलेल्या आश्वासनास जबाबदार आहेत.
“जुन्या रायबंदर रुग्णालयात आरोग्य सेवा सुविधा पुनर्संचयित केल्याने बांबोळी येथील जीएमसीवरील ओझे कमी होईल. ही वैद्यकीय सेवा सुविधा रायबंदर आणि शेजारच्या चिंबेल, मेरशी , ओल्ड गोवा आणि दिवाडच्या बेटातील रहिवाश्यांसाठी चांगली सेवा ठरली असती.
“सरकारला असा सल्ला देण्यात येईल की तिथे अनावश्यक आयुष प्रकल्प राबवू नये तर आधी सांगितल्याप्रमाणे आरोग्य केंद्र ठेवावे.” ओल्ड रायबंदर हॉस्पिटलमध्ये आशिया खंडातील प्रथम वैद्यकीय शाळा असलेल्या आरोग्य सेवा सुविधा पूर्ववत झाल्यास या सरकारसाठी ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. जी अन्यथा सर्वच आघाड्यांवर घसरत आहे, ”ते म्हणाले.