पर्वरी -गोयंकारपण
कोविड बाधितांना वा घरात विलगीकरण करण्यात आलेल्या कोविड रुग्णांना अन्न पुरविणाऱ्या सेवेचा आज केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. उत्तर गोव्याचे भाजपाचे अध्य़क्ष महानंद अस्नोडकर यांच्या पुढाकाराने पर्वरी मतदारसंघातील कोरोना रुग्णांना दुपारचे अन्न उपलब्घ करुन देणाऱ्या या संकल्पनेचा आज प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपाचे गोवा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि उत्तर गोव्याचे जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर हे ही उपस्थित होते.
`सेवा-ही-संघटन`ने पर्वरी भाजप मंडळ, पर्वरी भाजपयुमो , पर्वरी महिला मोर्चा, पर्वरी भाजप युवा मोर्चा यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
महानंद अस्नोडकर यांच्या पर्वरी येथील निवासस्थानी हा कार्यक्रम पार पाडला.
`अन्नदान` उपक्रमाला प्रारंभ केल्या नंतर खासदार श्रीपाद नाईक म्हणाले, ‘’ कोरोना रुग्णांची सध्याची स्थिती पाहून, मृतांची होणारी हेळसांड, त्यांची होणारी परवड बघून मनाला असय्य वेदना होतात. कोविद बाधित रुग्णांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे.कोरोना रुग्णांसाठी मलाही काही तरी करायचे आहे, या भावनेतून अन्नदान संकल्पनेचा जन्म झाला. लोकांना मला आवाहन करावेसे वाटते की, त्यांनी अशा प्रकारच्या कार्यात उत्फूर्तपणे भाग घ्यावा.या संकट समयी मला काही तरी करून दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे, या दृष्टिकोनातून विचार होणे गरजेचे आहे.” नाईक पुढे म्हणाले.
“सरकार आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. महामारीविरोधातील लढाईत आपलेही योगदान असणे ही काळाची गरज आहे. आपल्या शेजाऱ्यांनी संकट काळी माझी काळजी घेतली, अशी भावना रुग्णांच्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे, जेणे करून त्यांना संकटाचा सामना करण्यासाठी बळ मिळेळ. मी कुठे तरी मागे पडलो नाही ना, याचा अंतर्मुख होऊन विचार प्रत्येकाने करावा, शेजाऱ्यासाठी, गावासाठी मदत करण्यासाठी लोकांनी पुढे यावे, “असेही आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी केले.
गोव्याचे भाजपा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे नमूद केले आणि कोरोना विरुद्ध लढाई लढणाऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावलेल्यांचे त्यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी त्यांनी सरकारतर्फे चालू असलेल्या मोहिमेला सहकार्य करण्यासाठी ४५ वर्षांवरील प्रत्येकाने लस टोचून घ्यावी, असेही आवाहन केले.
सुरुवातीला महानंद अस्नोडकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना अन्नदानाच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. पर्वरी मतदारसंघातील कोविड बाधितांना/घरात विलगीकरण करण्यात आलेल्यांना आजपासून दुपारचे अन्न पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर गोव्याचे जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांनी आभार मानले.
गुरजूंनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा – शेखर भिसे ८०१०४१५०५९ किंवा राजकुमार प्रियोळकर ७०६६८९८०१६.