पणजी:गोयंकारपण वृत्त
सध्या चालू असलेल्या ऑक्सिजनच्या मुद्दयावर आम आदमी पक्षाने म्हटले आहे की,आता प्रश्न फक्त एका गोष्टीवर आला आहे तो म्हणजे गोव्यात पुरेसा ऑक्सिजन नाही आणि मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे पुरेसे धाडस नाही.”
गोव्याचा ऑक्सिजन (प्राणवायू) कोटा वाढवण्यासाठी सावंत सरकारने मोदी सरकारकडे ऑक्सिजन पुरवठ्याबाबत तातडीच्या मदतीची मागणी करावी अशी आपची सुरुवातीपासूनच भूमिका आहेत, असे राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले. याला जोडूनच ते म्हणाले की, मात्र मुख्यमंत्र्यांच्या भित्रेपणामुळे ते याविषयी मोदींशी बोलायला संकोच करत आहेत.
“गोवा स्वतः ऑक्सिजन उत्पादन करीत नाही आणि ऑक्सिजनसाठी संपूर्णपणे शेजारच्या राज्यांवर अवलंबून आहे. राज्या-राज्यांमधील ऑक्सिजन वितरण हे केंद्र सरकारच्या संपूर्ण नियंत्रणाखाली आहे, त्यामुळे गोव्यात असलेली ऑक्सिजनची कमतरता हे थेट मोदी सरकारचे अपयश आहे”, असा दावा म्हाबरे यांनी केला.
“मुख्यमंत्री सावंत हे केंद्राकडे मदतीची मागणी पूर्णपणे टाळत आहेत कारण त्यांना माहीत आहे की यामुळे आपले अपयश उघडे पडेल आणि मोदींना खाली पहावे लागेल. त्यामुळे गोव्याच्या रूग्णालयात अनावश्यकपणे लोक मरत आहेत. याला तेच कारणीभूत आहेत”, असे म्हांबरे म्हणाले.
म्हांबरे म्हणाले की,” याविषयी उच्च न्यायालयाने देखील ‘आप’च्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे मात्र तरीदेखील ऑक्सिजनच्या कमतरतेकडे अद्याप लक्ष दिले गेले नाही.काल रात्री गोमेकॉच्या एकापेक्षा अधिक कोविड वॉर्डात ऑक्सिजनची पातळी पुन्हा धोकादायक खालच्या पातळीवर आली. यावरून लक्षात येते की,गोमेकॉचे डीन ते आरोग्य सचिव ते आरोग्य मंत्री ते मुख्यमंत्री यांच्यापर्यंत प्रत्येकजण एकमेकांशी केवळ खो-खो खेळत आहेत व जबाबदारी पासून पळत आहे. मात्र यापैकी कोणीही स्पष्टपणे हे कबूल करत नाही की, गोव्यात आवश्यकतेनुसार पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नाही. मुख्यमंत्री जोपर्यंत केंद्राकडून ऑक्सिजनच्या योग्य पुरवठ्याची मागणी करत नाही, तोपर्यंत सिलिंडर, ट्रॉली, टाक्या इत्यादीं विषयीची सर्व चर्चा निष्फळ आहेत ”, असे म्हांबरे म्हणाले.
सदर प्रकरण कोर्टात असले तरी, अधिकारी व मंत्री जबाबदारीपासून पळ काढण्यासाठी आणखी काही दिवस, काही आठवडे ह्या प्रकरणाला कोर्टात लांब खेचू शकतात, असा इशारा म्हांबरे यांनी दिला.
“ कोर्टाची कार्यवाही सुरू राहू द्या, परंतु सावंत यांच्याकडे त्वरित केंद्राकडे मदतीची मागणी करण्याचे धैर्य नाहीत का? अरविंद केजरीवाल यांच्याकडून शिकण्यास जर त्यांना लाज वाटत असेल तर त्यांनी भाजपचेच मुख्यमंत्री मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडून शिकावे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केंद्राने कर्नाटकचा कोटा 300 मेट्रिक टनांवरून 1200 मेट्रिक टनापर्यंत वाढविण्यासाठी सातत्याने आणि धीटपणाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आणि यात यश मिळविले.
गोवेकरांसाठी लढा देण्याऐवजी आणि गोव्याचा कोटा वाढवण्याऐवजी सावंत मात्र अन्य राज्यात ऑक्सिजन पाठवण्याचे काम करत असल्याची खंत म्हांबरे यांनी व्यक्त केली. ऑक्सिजन वितरण केंद्र सरकारद्वारे नियंत्रित होत असल्याने सावंत यांना अशी बांधिलकी दाखविण्याचे कुठलेही अधिकार नसल्याचे म्हांबरे म्हणाले.
Keep Reading
Add A Comment