पणजी: गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसतर्फे २१ मे पासून सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रूग्णांना व त्यांच्या बरोबर असलेल्या नातेवाईकांना पाण्याच्या बाटल्या देण्यात येणार आहे. पाणी देण्याच्या या उपक्रमात सुमारे १० हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
जीपीवायसीचे अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकर म्हणाले की, २१ मे रोजी ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी पाळणार आणि नंतर म्हापसा येथील आझिलो, गोवा मेडिकल कॉलेज, मडगाव येथील दक्षिण जिल्हा रुग्णालय, फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालय आणि ईएसआय रुग्णालयाला भेट देतील,व तिथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना पाणी देणार.
दक्षिण गोवा जिल्हा युवक कॉंग्रेस समितीचे सदस्य दक्षिण गोव्यामध्ये वाटप करतील, तर उत्तर गोवा जिल्हा युवक कॉंग्रेस उत्तरेतील दोन सरकारी रुग्णालयात वाटप करेल.
“ मागील १५ ते २० दिवसांपासून आम्ही रूग्णांना ऑक्सिजन सिलिंडर आणि इतर आवश्यक वस्तू देण्यासाठी नियमितपणे या रुग्णालयांना भेट देत आहोत. त्या कालावधीत आमच्या लक्षात आले की कोविड संक्रमित रूग्ण आणि नातेवाईक पिण्यासाठी पाणी मिळविण्यासाठी संघर्ष करत आहेत. यासाठी आम्ही हा उपक्रम राबवण्याचे ठरविले आहे. ” असे अॅड. म्हार्दोळकर म्हणाले.
“ इतर पक्षांचे युवक सुद्धा कोव्हिड रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक गोष्टी पुरवून मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. कोविड रूग्णांना मदत देऊन युवकांनी ‘मानवता प्रथम’ याचे उदाहरण ठेवले आहे. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. ” असे म्हार्दोळकर म्हणाले.
“आम्ही युवा कॉंग्रेसचे सदस्य राजीव गांधीजी यांनी युवक व समाजासाठी केलेल्या कामातून प्रेरित आहोत. सध्या समाज कोविडच्या समस्येने ग्रस्त आहे आणि म्हणूनच त्यांना मदत करणे आपले कर्तव्य बनले आहे. ” असे अॅड. म्हार्दोळकर म्हणाले.
एनजीओए आणि इतर संस्थांमधील युवकांनी या कठीण वेळी समाजाला मदत करायला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
“आम्हाला कोविडची साखळी तोडण्याची गरज आहे आणि म्हणूनच त्यासाठी कार्य करण्याची गरज आहे.” असे ते म्हणाले.