पणजी -गोयंकारपण वृत्त
आपल्या स्वताच्या स्वार्थासाठी सर्व तत्वे बासनात बांधून मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केवळ सत्ता भोगण्यासाठी विवीध राजकीय पक्षांसोबत संसार मांडला. कॉंग्रेस बरोबर सरकारात सामिल होऊन सत्तेची फळे चाखली. आता सत्तेबाहेर असल्याने ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. सुदिन ढवळीकरांच्या चेल्यानी कॉंग्रेस पक्षाला उपदेश देण्याची गरज नाही,असे कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांबद्दल आम्हाला अभिमान असुन, सुदिन ढवळीकरांनी मंत्रीपद भुषवलेल्या सरकारातील माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व दिगंबर कामत यांनी त्यांच्या कारकिर्दीत गोव्यात लोकाभिमूख सरकार चालवुन योगदान दिलेले आहे. गोमंतकीय जनतेचे हित सांभाळुनच कॉंग्रेस पक्षाने निर्णय घेतले व प्रसंगी लोकांसमोर नमते घेवुन लोक भावनेचा आदर केला.
आमचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची पक्ष निष्ठा, सचोटी व प्रामाणिकपणा हा सर्वज्ञात असुन, भाजप सरकारला मुदतवाढ द्या असे सुचविणारे सुदिन ढवळीकरांचे वक्तव्य गोव्यातील वर्तमानपत्रांत छापुन आले होते. त्यावरच आमचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी योग्य प्रतिक्रीया दिली होती. आता सदर वक्तव्याचा विपर्यास झाला असे म्हणणाऱ्या ढवळीकरांच्या चेल्याना पत्रकारांना खोटारडे म्हणायचे आहे का?,असा सवाल अमरनाथ पणजीकर यांनी विचारला आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांच्या मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळुनही अती स्वार्थापोटी सुदिन व दीपक ढवळीकरांनी मगो पक्ष कार्यकारणीचा निर्णय झाला नसतानाच भाजपचे यु-टर्न मास्टर स्व.मनोहर पर्रिकरांची साथ धरली होती व तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या पाठित सुरा खुपसला होता, हे पुर्ण गोव्याला माहित आहे. यामुळे ढवळीकरांचे पक्ष प्रेम किती आहे हे स्पष्ट होते असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.
आमचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सुदिन ढवळीकरांना त्यांच्या भाजपकडील सबंधावर उघडे पाडले,त्याच्या दुसऱ्याच दिवशी सुदिन ढवळीकरांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडुन डॉ. प्रमोद सावंतानी शिकावे असा सल्ला दिल्याने आमच्या अध्यक्षानी केलेल्या दाव्याला त्यानी पुष्टीच दिली असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.