पणजी -गोयंकारपण वृत्त
गोव्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या कोविडच्या दुसर्या लाटेमुळे दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला, अशी माहिती ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) मंगळवारी दिली.
‘आयएमए’च्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या लाटेमध्ये तब्बल 513 डॉक्टर विषाणूचे बळी ठरले आहे.
डॉक्टरांमधील कोविडशी संबंधित मृत्यूबाबत ताज्या राज्यवार आकडेवारी जाहीर करताना ‘आयएमए’ने म्हटले आहे,की दिल्लीत सर्वाधिक 103 डॉक्टरांचे मृत्यू झाले आहेत. बिहारमध्ये 96 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे तर उत्तर प्रदेशात 41 जणांचा मृत्यू दुसर्या लाटेत झाला आहे.राजस्थानमधील कोविडमुळे 39 डॉक्टरांचे निधन झाले , तर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 29 डॉक्टरांना मृत्यू पहावा लागल्याचेही या आकडेवारीतून समोर आले आहे.
‘आयएमए’च्या म्हणण्यानुसार 2020 मध्ये कोविड च्या पहिल्या लाटेच्या वेळी भारताने 748 डॉक्टर गमावले होते.
‘आयएमए’ने म्हटले आहे की कोविडमुळे आतापर्यंत एक हजार डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे, परंतु वास्तविक संख्या जास्त असू शकते. कारण डॉक्टरांच्या संघटनेने देशभरातील त्याच्या विविध शाखांमधील माहितीच्या आधारे केवळ 3.5 लाख सदस्यांच्या मृत्यूची नोंद ठेवली आहे. भारतात 12 लाखांहून अधिक डॉक्टर आहेत.