पणजी -गोयंकारपण वृत्त
तौक्ते चक्रीवादळामुळे गोव्यात हाहाकार माजला. कोविड महामारीत सरकारच्या नाकर्तेपणाने कष्ट भोगत असलेल्या लोकांवर वादळामुळे नविन संकट आले. भाजप सरकारची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा मेल्याचे तौक्ते चक्रीवादळाने उघड केले, अशी टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत, योग्य सुविधांच्या अभावी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी मदत करणारे वीज व अग्नीशमन दलाचे कर्मचारी तसेच इतर समाजसेवक यांचे आम्ही जाहिर अभिनंदन करतो. लोकांसाठी आपले कर्तव्य बजाबणाऱ्यांना सलाम…., असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.
वीज मंत्री निलेश काब्राल यांना मंत्रीपदी राहण्याचा नैतीक अधिकार नसुन, त्यांनी आपली खुर्ची ताबडतोब सोडावी. आपले कर्तव्य बजावण्यास ते पुर्णपणे अपयशी ठरले आहेत. सार्वजनीक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांचा पत्ताच नाही. लोक पाण्याविना हाल काढत आहेत. कोविड महामारीत सरकारने लोकांना यातना दिल्या आहेत. चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. पिकांची नासाडी झाली असुन, शेतकरी हवालदिल आहे. कृषीमंत्री बाबू कवळेकर गायब असुन, कदाचीत आपल्या मोबाईलवरुन व्हिडीयो पाठविण्यात ते व्यस्त असतील,असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.
आज आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अस्तित्वातच नाही. उत्तर गोव्याचा बहुतांश भाग मागील तीन दिवस अंधारात आहे. वीज खात्याचे कर्मचारी वीज पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांच्याकडे आवश्यक उपकरणेच नसल्याने त्यांच्यावर मर्यादा येत आहेत.
वीज खात्याचा भोंगळ कारभार आता उघड झाला आहे. आवश्यक ते मनुष्यबळ, वाहने, शिडी व क्रेन तसेच इतर साधन सामग्री नसल्याने वीज कर्मचाऱ्यांच्या कामावर मर्यादा येत आहेत. कोसळलेल्या खांबाच्या जागी नविन उभारण्यासाठी खांबच नाहीत अशी परिस्थिती आहे.
बोरी येथे वीज खांब घेवुन जाणाऱ्या एका जुन्या ट्रकला अपघात होवुन प्राणहानी झाली होती. परंतु, वीजमंत्री निलेश काब्रालानी धडा घेतलेला नाही. वीज कर्मचाऱ्यांना अजुनही आवश्यक सुरक्षा कवच देण्यात आलेले नाहीत हे धक्कादायक आहे. काल पर्वरी येथे वीजेचा शॉक लागुन एक कर्मचारी खाली कोसळला.परंतु त्याला इस्पितळात नेण्यासाठी तेथे सरकारी वाहन नव्हते. स्थानिकांनी त्याला इस्पितळात नेल्यानेच त्याचे प्राण वाचले असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
भाजप सरकारला जाहिरातबाजीचा शौक असुन, प्रधानमंत्री मोदींचे फोटो घालुन जनतेच्या पैशाने आपली जाहिरात करुन घेण्याची सवंय सरकारला आहे. परंतु, चक्रीवादळाची धोक्याची सुचना देणारी एकही जाहिरात सरकारने प्रसिद्ध केली नाही. आपत्कालीन प्रसंगावेळी कोणत्या भागात कुठल्या अधिकाऱ्याकडे संपर्क साधावा हे लोकांना कळविण्याचे भानही सरकारने ठेवले नाही. आपत्कालीन निवारा व्यवस्था व मदत केंद्रे यांची कोणतीच तयारी सरकारने केली नव्हती.
बार्देस तालुक्यात वादळाची सर्वाधिक झळ बसली असुन, उत्तर गोव्यातील प्रमुख शहर असलेल्या म्हापशात तीन दिवस वीज गायब आहे. राजधानी पणजी व सभोवतालच्या परिसरातही वीज नसल्याने लोकांचे हाल झाले. सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हळदोणा, डिचोली, चोडण व इतर भाग अजुनही अंधारात आहेत. ‘पार्टी व्हिथ अ डिफरंस’ म्हणवणारा भाजप मात्र आपले मंत्री, आमदार व नगरसेवकांमधील भांडणे सोडवण्यात व्यस्त आहे असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला.







