पणजी :गोयंकारपण वृत्त
‘आम आदमी पक्षा’ने (आप ) गोव्यात युद्धपातळीवर लसीकरण करण्याची मागणी पुन्हा एकदा केली. कोविडविरूद्धची लढाई लढण्यासाठी उपचार आणि लसीकरण या दोन शस्त्रांचा एकत्रितपणे वापर करणे गरजेचे आहे, असे पक्षाचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी म्हटले आहे.
म्हाबरे म्हणाले की, येत्या 30 दिवसांत गोव्यातील संपूर्ण जनतेला किमान लसीचा एक डोस देण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे.
म्हांबरे यांनी गावपातळीवर, शाळेच्या आवारात आणि सामाजिक हॉलमध्ये लसीकरण शिबिर आयोजित करण्याची सूचना दिली.
“लसीकरणाच्या या कामात सरकारने केवळ खासगी रुग्णालयेच नव्हे तर स्वयंसेवी संस्था, धार्मिक व सामाजिक संस्था आणि कॉर्पोरेट्स यांची देखील मदत घेतली पाहिजेत. रोटरी क्लब आणि लायन्स क्लब सारख्या संस्थांनी पोलिओ निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याच्या मोहिमेवर सरकारबरोबर यशस्वीरित्या काम केलेले आहे”, असे ते म्हणाले.
म्हांबरे यांनी सांगितले की,आप ने दिल्लीत 18 वर्षांपुढील तसेच सर्व वयोगटातील लोकांसाठी दिल्लीत लसीकरण शिबिर आयोजित करण्यास पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 3 महिन्यांत दिल्लीतील संपूर्ण दोन कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवले असून देशातील सर्वात जास्त लसीकरण केंद्रासह त्यासाठी लागणाऱ्या पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. विशेष म्हणजे दिल्लीच्या तरुणांकडून या मोहिमेला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.गोवा सरकारने लवकरात लवकर गोव्याच्या तरूणांना तशीच संधी द्यावी. कारण कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा नवा प्रकार (Mutant Strain) युवकांसाठी जीवघेणा ठरत आहे.
दरम्यान,गोवा सरकारने 18 ते 45 वयोगटातील जनतेची लसीकरणाची तारीख देखील अद्याप जाहीर केलेली नाही, असे सांगताना म्हांबरे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “सरकारचा सध्याचा लसीकरणाचा वेग पाहता, संपूर्ण लसीकरणास एका वर्षापेक्षा अधिक कालावधी लागेल. तोपर्यंत कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत मात्र वाढ होईल.