पणजी :गोयंकारपण वृत्त
‘तहलका’ मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांच्याविरोधात 2013सालच्या दाखल झालेल्या बलात्कार प्रकरणात म्हापसा जलद कृती न्यायालयाने 19 मे रोजी निकाल सुनावणारअसल्याचे सांगितले आहे. हा निकाल आज जाहीर होणार होता पण कोरोनाच्या नियमामुळे फक्त 15 टक्के न्यायालयीन कर्मचारी काम करत असल्यामुळे तो तहकूब करण्यात आला
तत्पूर्वी, विशेष सरकारी वकील फ्रान्सिस्को टाव्होरा यांनी माध्यमांना सांगितले की, आरोपीला दोषी ठरविण्यात आल्यास “न्यायाधीशांच्या विचारानुसार” किमान 10 वर्षे ते जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
तरुण तेजपाल यांना उत्तर गोव्यातील पंचतारांकित रिसॉर्टमध्ये एका महिला सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाल्यानंतर 30 नोव्हेंबर 2013ला अटक करण्यात आली होती. तो सध्या जामिनावर बाहेर आहे.
याआधी,29 सप्टेंबर, 2017 रोजी कोर्टाने त्याच्यावर बलात्कार, लैंगिक छळ आदी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आरोप ठेवले होते. त्याने मात्र आपण दोषी नसल्याचे सांगितले.
सप्टेंबर 2017 मध्ये खटला सुरू झाला परंतु उशीर होतच राहिल्याने तेजपाल यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपाला आव्हान दिले होते.
ऑगस्ट 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांची बाजू फेटाळली आणि खटला ‘इन-कॅमेरा’ (सार्वजनिकरित्या खुला न करता ) ठेवण्यासाठी आणि सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले.