मडगाव :गोयंकारपण वृत्त
एका दुर्दैवी घटनेत,दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य टाकीत प्राणवायू स्थानांतरित करणाऱ्या टँकरमधून गळती झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राणवायूने भरलेला एक टँकर मुख्य प्राणवायूच्या टाक्या भरण्यासाठी आला होता. मात्र, मंगळवारी दुपारी 2.15 वाजता कामगार व सुरक्षारक्षकांना वायू गळतीची बाब लक्षात आल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ताबडतोब अग्निशामक दलाच्या गाड्या मागविण्यात आल्या व गळती थांबवण्यात आली . मात्र, घटनेदरम्यान एक कामगार किरकोळ जखमी झाला असून त्याला एसडीजीएच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्याने सांगितले की, “घटना नियंत्रणाखाली असली तरी घटनेची पूर्ण चौकशी करण्यास सांगितले आहे.अग्निशमन विभागाकडून आम्हाला अद्याप तांत्रिक अहवाल मिळालेला नाही.
अग्निशमन विभागाचे प्रमुख नितीन रायकर यांना या घटनेविषयी विचारले असता ते म्हणाले की, त्यांच्या विभागाने गळतीचा ताबा घेतला असून परिस्थिती धोक्याच्या बाहेर आहे.
आम्हाला गळतीचे कारण सापडले आहे.